
बीड: करोनाची लागण झालेल्या एका रुग्णाचा शहरासह विविध गावांतील अनेकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्क झाल्याचं आढळून आल्यानं बीड जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं बीडसह काही गावे कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली असून पुढील आठ दिवस पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसे आदेश दिले आहेत. पाटोदा तालुक्यातील कारेगावचा एक रुग्ण करोनाची लागण झालेला आढळलेला आहे. त्याचा बीड शहरातील व आसपासच्या काही गावांतील अनेकांनी संपर्क आल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तसा अहवालही सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर इतर ठिकाणी प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संपूर्ण बीड शहरात व बीड तालुक्यातील खंडाळा, चऱ्हाटा, पालवण व इट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही व धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव या गांवामध्ये आठ दिवसांसाठी संचारबंदी राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात काय? >> ४ जून रात्री १२ वाजेपर्यंत संबंधित भागातील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. >> वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा २४ तास सुरू राहतील. बीड शहरात व वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश करता येणार नाही व शहराबाहेरही जाता येणार नाही. >> अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना शासकीय, खाजगी व बँका बंद राहतील. >> बीड शहरातील शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना व बँकांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांच्याशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादित कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घेता येईल. >> बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्ह्यात वा राज्यांत जाण्यासाठी ऑनलाईन वा ऑफलाईन पास मिळणार नाही. >> वैद्यकीय तातडीच्या कामासाठी बीड शहरातील नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरून पास घेता येईल.