चोरलेले दागिने 'त्याने' पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज घेतले, पण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 12, 2021

चोरलेले दागिने 'त्याने' पतसंस्थेत गहाण ठेवून कर्ज घेतले, पण...

https://ift.tt/3pg2OIZ
म. टा. प्रतिनिधी, नगर: चोरीचे दागिने सराफाला विकून पैसे मिळवण्याची पद्धत चोरटे वापरतात. मात्र, तालुक्यात एका कारचालकाने चोरलेले दागिने पतसंस्थेत गहाण ठेवून त्यावर कर्ज काढले. चोरीचे दागिने सराफाला विकताना पकडले जाऊ नये, यासाठी या चोराने ही शक्कल लढविली असली तरी, त्याची पकडली गेली. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे ही घटना घडली. कारचालक रविकिरण सुखदेव मंडलिक (रा. समशेरपूर, ता. अकोले) याने एक लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरले होते. कारमधून प्रवास केलेल्या प्रवाशांच्या बॅगेतून त्याने हे दागिने चोरले होते. मालदाड येथील भाऊपाटील नवले यांची बहीण व भाऊ मुंबईत राहतात. त्यांना गावी आणण्यासाठी त्यांनी १७ डिसेंबर २०२० रोजी कार पाठविली होती. कारचालक म्हणून मंडलिक याला पाठविले होते. ठरल्याप्रमाणे तो मुंबईला गेला आणि त्या दोघांना घेऊन गावी परत आला. परत येताना रात्रीचे नऊ वाजले होते. कारमधून सर्वजण उतरल्यानंतर चालक मंडलिक याने गाडीतील बॅगा नवले यांच्या घरासमोर ठेवल्या आणि तो निघून गेला. घरातील मंडळींनी नंतर बॅगा आत ठेवल्या. त्यानंतर ३१ जानेवारीला नवले यांच्या बहिणीला पुण्याला जायचे होते. त्यावेळी तयार होत असताना त्यांनी दागिने ठेवलेली बॅग उघडली. तर त्यामध्ये दागिने नव्हते. गंठण, झुबे, सोन्याची नाणी असे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुंबई ते मालदाड एकूण घटनाक्रम लक्षात घेता त्यांच्यासोबत केवळ चालक मंडलिक होता. त्यानेच बॅगा उचलताना दागिने चोरल्याचा संशय आला. खात्री पटल्यावर नवले यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. संशयित म्हणून चालकाचे नाव घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबुल केला. बॅगा उचलताना नजर चुकवत त्याने दागिने काढून घेतले होते. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासंबंधीची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली. त्याने दागिने एका नामांकित पतसंस्थेत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतले. पतसंस्थेनेही खातरजमा करून न घेता, त्याच्याकडील दागिने स्वीकारून कर्ज दिले. चोरी पकडली जाऊ नये, यासाठी आरोपी मंडलिक याने ही शक्कल लढवल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी हे सर्व दागिने जप्त केले आहेत.