
तेल अविव: इस्रायल आणि पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असणाऱ्या संघर्षामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे. पॅलेस्टाइनमधील सशस्त्र गट हमासकडून इस्रायलवर आतापर्यंत १३०० रॉकेट डागण्यात आले. तर, इस्रायलकडून सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. या हिंसक संघर्षाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटू लागले आहेत. इस्रायलला धडा शिकवावा लागणार असल्याचे तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना म्हटले आहे. एर्दोगन यांच्या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तुर्कीच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी बुधवारी दूरध्वनींवरून चर्चा केली. जेरूसलेमधील वादाबाबत चर्चा करण्यात आली. एर्दोगन यांनी पुतीन यांच्याशी बोलताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. संयु्क्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेला यावर त्वरीत हस्तक्षेप करायला हवा. जेणेकरून इस्रायलला स्पष्ट संदेश दिला जाईल. वाचा: एर्दोगन यांनी पॅलेस्टाइन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा बलाबाबत विचार करण्याची आवश्यकता असल्याचे पुतीन यांना सांगितले. दरम्यान, इस्तांबूलमध्ये हजारो नागरिकांनी मंगळवारी संध्याकाळी देशव्यापी सुरू असलेल्या करोना संचार बंदीला झुगारून देत इस्रायली हल्ल्याविरोधात निदर्शने केली. मोठ्या संख्येने नागरिकांनी कारसह आणि पॅलेस्टाइनचे झेंडे घेत इस्रायली दूतावासाजवळ निदर्शने केली. वाचा: संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा संयुक्त राष्ट्र संघाचे मध्यपूर्वमधील दूतांनी इशारा दिला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील गटांमध्ये सुरू असलेला हिंसाचार न थांबल्यास मोठे युद्ध होऊ शकते. टॉर वेनेसलँड संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत याबाबतची माहिती देतील.