विशेष लेख: जयंत पवार... लढवय्या लेखक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 30, 2021

विशेष लेख: जयंत पवार... लढवय्या लेखक

https://ift.tt/3sUbxnG
प्रफुल्ल शिलेदार गेली काही वर्षे दुर्धर आजाराशी लढत होता. त्या लढ्याची अखेर झाली. मात्र त्याने आपल्या लेखनातून जे अनेक लढे लढले त्याची अखेर होणे शक्य नाही. ते लढे पुढे अनेकांना बळ पुरवत राहतील. जयंतनं 'अधांतर'मधून जगण्यातील जे नाट्य उभं केलंय ते अनन्यसाधारण आहे. रंगभूमीवर एखाद्या वावटळीसारख्या आलेल्या या नाटकानं जयंतचं नाटककार म्हणून स्थान निश्चित केलं. मात्र त्याचसोबत गेली दोन दशके त्यानं कथा लिहिल्या. कादंबरी लिहिण्याचे अनेकांचे सल्ले त्याने विनम्रतापूर्वक नाकारले. मला कथाच लिहायची आहे असं तो ठामपणे सांगत असे. कथा लिहून त्यानं मराठी कथेतील साचेबद्धता तर मोडलीच, पण साचेबद्धता मोडण्याचे रूढ झालेले तथाकथित संकेतही जाणीवपूर्वक टाळले. तो सहृदयतेनं आणि मानवी करुणेनं लिहिणारा लेखक होता. आपण जे लिहितो ते आपल्याला वाचणाऱ्याच्या मेंदूतच नव्हे तर हृदयात पेरायचे आहे याची त्याला जाणीव होती. त्याकरता वेगवेगळी साधनं त्यानं वापरली. कथेची दीर्घता तो बदलत राहिला. त्याच्या काही लांब पल्ल्याच्या 'वरनभातलोन्चा...' सारख्या दीर्घकथा आहेत, तर काही 'मरणाच्या गोष्टी'मधील अगदी तीसेक शब्दांपासून ते साठसत्तर शब्दांपर्यंतच्या लहान गोष्टी आहेत. समृद्धीचा सुकाळ दिसणाऱ्या महानगरी जीवनातला कष्टकरी, शोषित आणि परिघावरील वंचित वर्ग त्याने आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणला. वरवर देखण्या डौलात जगणाऱ्या महानगरातील प्रचंड विषमतेची खोल दरी नेमकेपणानं दाखवली. मुंबईत अगदी कोकणातून आलेल्या गिरणी कामगारांपासून ते युपीबिहारातून रोजीरोटीकरता आलेल्या भैय्यांपर्यंतचा एक मोठा स्थलांतरितांचा वर्ग राहतो. जयंत स्वतः त्या वर्गाचा प्रतिनिधी होता. आपल्या लेखनात त्याने कुठलाही अभिनिवेश न ठेवता या वर्गाचा जगण्याचा संघर्ष अतिशय भेदकपणे मांडला. जयंतने महानगरातले पेच ज्या ताकदीने मांडले त्या ताकदीने ते या आधी कथेत भाऊ पाध्ये यांनी, तर कवितेत नामदेव ढसाळ व प्रकाश जाधव यांनी मांडलेले दिसून येतात. त्याच्या सगळ्या लेखनाच्या तळाशी समताधिष्ठित वैचारिक भूमिका, सत्यान्वेषी वृत्ती दिसून येते. त्याच्या अखेरच्या कथासंग्रहाच्या सुरुवातीला त्याने फैझ अहमद फैझ यांच्या ओळी उधृत केल्या आहेत: बोल कि सच जिंदा है अबतक बोल जो कुछ कहना है कह ले... या ओळी त्याच्या भूमिकेचाच उच्चार करतात. तो आपल्या लेखनातून त्याला गवसलेले सत्य निर्भीडपणे मांडत गेला. जयंत शांत उमदेपणानं जगणारा लढवय्या होता. कुणाशी लढायचं, कसं लढायचं हे त्याला नेमकं ठाऊक होतं. तो सत्तेला थेट प्रश्न विचारत होता. साधनहीन, शोषित, दबलेल्या वर्गाचे चित्रण आपल्या लेखनातून करत होता. साधनहीन माणसाच्या अंगावर धावून येणारं एकटेपण हे अधिक विदारक असतं. अशा वेळेस तो आपल्या लेखनातून त्यांच्या बाजूने उभे राहिला. प्रत्यक्षातही जेव्हा लेखकांतर्फे अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायची वेळ येई त्यावेळेस जयंत नेहमीच दिशा देत सोबत राहिला. जयंतला कथेचं शिल्प आणि वास्तवाच्या मर्यादा याची नेमकी जाणीव होती. आपल्याला वास्तवाशीच भिडायचं आहे, मात्र कथेत ते नुस्तं येऊन चालणार नाही याची त्याला कल्पना होती. त्यामुळे त्याची कथा फँटसीच्या वाटेनं जात आपला पैस वाढवत अंतर्मनातल्या अनेक स्तरांना भिडत गेली. जागतिकीकरणाच्या डेंजर वाऱ्यानं उडून चाललेलं छप्पर कुणाकुणाला उघड्यावर आणून सोडणार आहे याची ठळकपणे कल्पना देत मराठी कथेचं मोठेपण त्यानं सिद्ध केलं. साठोत्तरी पिढीनंतरच्या पिढीतील मोठा लेखक कोण याचं उत्तर लगेच देता येत नव्हतं. हा तिढा जयंतनं आपल्या कथालेखनानं सोडवला. जयंत हा आमच्या पिढीचा आपल्या भाषेतला असा लेखक आहे ज्याचं नाव आम्ही इतर भाषेतल्या लेखकांपुढे अभिमानानं घेत आलो आहोत. जयंतच्या लेखनाचे सातत्याने अनुवाद होत गेले. त्याच्या कथांच्या गोरख थोरात यांनी केलेल्या हिंदी अनुवादाचे दोन खंड नुकतेच प्रकाशित झाले आहेत. इंग्रजी अनुवादात त्याची नाटके आणि कथा येत आहेत. भाषणे, लेख, मुलाखती असे चौफेर लेखन जयंतने केले आहे. त्याने सुमारे तीस वर्षे नाटकाच्या प्रयोगांची परीक्षणे लिहिली. एका अर्थाने तो प्रयोगाच्या अंगाने लिहिला गेलेला मराठी रंगभूमीचा इतिहासच आहे. जयंत आपल्या जगण्याचं सहृदयतेनं भरलेलं आख्यान मागे सोडून गेलाय. अखेरच्या काळात जयंत मृत्यूला जवळून निरखत होता. ते त्याच्या लेखनातून जाणवत होतं. आणि इतक्या निर्भयपणे तो मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून कसे पाहू शकतो या जाणीवेनं थरकाप होत होता. 'लेखकाचा मृत्यू..' या कथासंग्रहाच्या सुरुवातीला त्याने शैलेन्द्र यांच्या ओळी दिलेल्या आहेत. अपनी कहानी छोड जा कुछ तो निशानी छोड जा... जयंत आपली गोष्ट, आपल्या स्मृती, अनेक आठवणी मागे ठेवून निघून गेलाय. त्याने मागे ठेवलेल्या या मजबूत खुणा काळाच्या ओघातही पुसल्या जाणं अवघड आहे.