मध्यप्रदेशातील शस्त्रे छुप्या मार्गाने मुंबईत आणली अन्...; समोर आला धक्कादायक प्रकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 19, 2021

मध्यप्रदेशातील शस्त्रे छुप्या मार्गाने मुंबईत आणली अन्...; समोर आला धक्कादायक प्रकार

https://ift.tt/2W7qTcr
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईमध्ये शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रोळी येथून बुधवारी अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून आठ पिस्तूल आणि जिवंत काडतुसांचा साठा हस्तगत केला. ही शस्त्रे मध्य प्रदेशातून आणल्याचा प्राथमिक अंदाज असून ते ती कोणाला विकणार होते, याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. यासिन खान आणि अजहर खान अशी या आरोपींची नावे आहेत. मध्य प्रदेशात तयार होणारी शस्त्रे छुप्या मार्गाने मुंबईत आणून ती गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना विकण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. काही तरुण शस्त्रे विकण्यासाठी मुंबईत येत असल्याचे युनिट ७चे प्रभारी पोलिस निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना गुप्त बातमीदाराकडून समजले. त्यानुसार सहायक निरीक्षक आनंद बागडे, अमोघसिद्ध ओलेकर, उपनिरीक्षक धोत्रे, चव्हाण, काळे यांच्या पथकाने पूर्व द्रुतगती महामार्गावर सापळा लावला. तेथे दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. त्यांच्या हालचालींवरून पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीची आठ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे सापडली. हे दोघेही मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील असून इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने यामागे मोठी साखळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने दोघानाही २३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.