
मुंबई : गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला कपात करून ग्राहकांना सुखद धक्का देणाऱ्या कंपन्यांनी दर कपातीला ब्रेक लावला आहे. आज सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. जागतिक बाजारात प्रती बॅरल ७३ डॉलरवर गेला आहे. त्यामुळे इंधन आयातीचा खर्च वाढला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. मुंबईत आज एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.५२ रुपये आहे. आज दिल्लीत पेट्रोल १०१.४९ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.२० रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.८२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.९१ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.९८ रुपये झाले आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैसे कपात केली होती. त्याआधी सलग ४२ दिवस पेट्रोल दर स्थिर ठेवले होते. आज देशभरात डिझेल दर सुद्धा स्थिर आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९६.४८ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.९२ रुपये आहे. चेन्नईत ९३.५२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.९८ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.७२ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.३४ रुपये आहे. अमेरिकेत कच्च्या तेलाचा साठा कमी झाल्याने तेलाचे भाव तेजीत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.अमेरिकन कमॉडिटी बाजारात आठवडाभरात ब्रेंट क्रूडचा भाव १.६३ डॉलरने वधारला आणि तो ७२.७० डॉलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३२ डॉलरने वधारून ६८.७४ डॉलर झाला होता. आज सोमवारी सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाचा भाव ०.२९ डाॅलरने वधारुन ७२.९१ डाॅलर प्रती बॅरल झाला. डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीत ०.०८ डाॅलरची घसरण झाली. तेलाचा भाव प्रती पिंप ६८.६६ डाॅलर झाला आहे.