
झुन्झुनूः पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी (ISI) काम करणाऱ्या एका व्यक्तीला राजस्थानच्या झुन्झुनू जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या गुप्तचर विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा एक गॅस एजन्सी चालवत होता. आरोपी लष्करालाही गॅस सिलिंडरचा पुरवठा करत होता. आरोपीची चौकशी सुरू अटक केलेल्या आरोपीचे नाव संदीप कुमार असे आहे. लष्कराच्या कॅम्पमधील गोपनीय माहिती तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला देत होता, असं सांगण्यात येत आहे. राजस्थानच्या गुप्तचर विभागाकडून आरोपी संदीप कुमारची चौकशी केली जात आहे. विभागाने लष्कराच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सॅपद्वारे माहिती पुरवली लष्कराच्या नरहर येथील कॅम्पची संवेदनशील माहिती आणि फोटो पाकिस्तानी हँडलर्सना व्हॉट्सअॅप, व्हाइस कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे दिल्याचा संदीप कुमारवर आरोप आहे. त्याची १२ सप्टेंबरला प्राथमिक चौकशी केली गेली आणि त्यांनतर त्याला अटक करण्यात आली. आधी भाजीपाला देणाऱ्याला झाली होती अटक राजस्थानच्या पोखरणमध्ये जुलै महिन्यात एकाला अटक करण्यात आली होती. तो आयएसआयला लष्कराच्या कॅम्पची गोपनीय माहिती पूरवत होता. हा आरोपी लष्कराच्या कॅम्पला भाजीपाला पुरवठ्याचं काम करत होता.