
मुंबई: अभिनेत्री डान्सरपेक्षाही ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीची रवानगी लवकरच पोलिसठाण्यात होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मेरे वरगा या नव्या गाण्यासाठी आदिवासी पोषाखात अश्लील हावभाव करणाऱ्या राखीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी समाजाने केली आहे. जर गुन्हा दाखल झाला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनेने दिल्यामुळे राखीचा एक पोषाख तिच्या चांगलाच अंगलट आल्याने राखीचा मस्तीचा मूड चांगलाच उतरला आहे. राखी सावंत नेहमीच काही ना भन्नाट बोलून किंवा व्हिडिओ शूट करून चर्चेत राहण्याची हौस भागवून घेत असते. काही दिवसांपूर्वी विमान चालवण्याची भाषा तिने केली. तर आलिया रणबीरच्या लग्नात रणबीरचे बूट लपवून ठेवणार असल्याच्या वाफाही तिने सोडल्या. एरव्ही राखीचे बोलणे तिचे चाहते चेष्टेवारी नेतात पण यावेळी मात्र राखीच्या तोंडचे पाणी आदिवासींनी पळवले आहे. मेरे वरगा या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी राखीने आदिवासी समाजाची वेशभूषा केली. यामध्ये तिने मिनी स्कर्ट, बिकिनी टॉप आणि केसात पिसे लावले होते. पोषाखाला आदिवासींचा आक्षेप नाही पण त्या पोषाखात अश्लील हावभाव करून समाजाच्या पारंपरिक वेशभूषेची बदनामी केल्याचा आरोप राखीवर करण्यात आला आहे. यावरूनच आदिवासी संघटनेने परभणीतील जिंतूर पोलिसठाण्यात धाव घेतली आहे. राखीवर अॅट्रासिटी अॅक्ट आणि सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राखीने केलेल्या आदिवासी पोषाखातील व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झाल्याने आदिवासींच्या पारंपरिक पोषाखाची बदनामी झाली आहे. तक्रार देऊनही अद्याप राखीविरोधात काहीच अॅक्शन न घेतल्याने आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाईल असा इशारा दिल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. गाण्याच्या प्रमोशनसाठी केलेली ट्रीक राखीच्या अंगलट आल्याने तिच्यासमोरील अडचणीही वाढल्या आहेत. राखीवर गुन्हा दाखल करावा यासाठी विश्व आदिवासी सेवा संघटनेच्यावतीने लेखी स्वरूपात केली आहे. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र बागुल, परभणी जिल्हाध्यक्ष डॉ.देवराव कराळे, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष भतेश पाडवी, जिल्हासदस्य शिवाजी साबळे यांच्या सह्या आहेत.