दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा दिवस, फटाके फोडण्यावरुन थरार, ३ अल्पवयीन मुलांचं धक्कादायक कृत्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 25, 2022

दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा दिवस, फटाके फोडण्यावरुन थरार, ३ अल्पवयीन मुलांचं धक्कादायक कृत्य

https://ift.tt/fwFGvpU
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये फटाके फोडण्यावरून हटकल्यामुळे संतापलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी २१ वर्षाच्या तरूणाची हत्या केली. सुनील शंकर नायडू (२१) असे मृत तरूणाचे नाव असून शिवाजीनगर पोलिसांनी दोन मुलांना पकडले आणि एकाचा शोध सुरू आहे. शिवाजीनगरच्या नटवर पारेख कंपाऊंड येथील मोकळ्या मैदानात १२ वर्षाचा मुलगा सोमवारी दुपारी काचेच्या बाटलीतून फटाके लावत होता. काचेची बाटली फुटल्यास हानी होण्याची भिती असल्याने सुनिल नायडू याने या मुलास रोखले. बाटलीमध्ये फटाके लावू नकोस असे बजावल्याने त्या मुलास राग आला. त्याने आपल्या १५ वर्षाच्या भावाला आणि १४ वर्षाच्या मित्राला नायडूबाबत सांगितले. नायडू एकटा असल्याचे पाहून तिघांनी याच मुद्यावरून त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. आम्ही कसेही फटाके फोडू तू विचारणारा कोण? असा जाब त्यांनी नायडूला विचारला. अल्पवयीन मुले असल्याने आवाज चढवल्यास घाबरतील असे त्याला वाटले आणि त्याने तिघांना दटावण्याचा प्रयत्न केला. नायडूच्या दमबाजीला न घाबरता उलट तिघांनी त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. नायडूने प्रतिकार केला मात्र १५ वर्षाच्या मुलाने त्याच्याकडील चाकूने नायडूच्या मानेवर वार केले. आरडाओरड ऐकून आजूबाजूचे रहिवाशी जमा झाले. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या नायडूला रूग्णालयात नेले. दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले तर एकाचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार समितीपुढे हजर करणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.