आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनकोंडी; अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 25, 2022

आरोग्य कर्मचाऱ्यांची वेतनकोंडी; अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही

https://ift.tt/TOcLrw1
म. टा. वृत्तसेवा, पालघरः राज्याच्या आरोग्य विभागातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन न मिळाल्यामुळे राज्यभरातील अडीच हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळीही यंदा अंधारातच गेली आहे. किमान दिवाळी संपण्यापूर्वी तरी आरोग्य कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावे, अशी मागणी औषध निर्माण अधिकारी संघटनेने सरकारकडे केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत १७ आणि ठाणे जिल्ह्यात पाच आरोग्य पथके कार्यरत आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य पथकात सहा पदे मंजूर असून, राज्यातील ३६ जिल्ह्यांत अंदाजे ३०० ते ३५०च्या आसपास प्राथमिक आरोग्य पथके असून, या पथकांत अडीच हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे वेतन अद्यापही शासनाकडून देण्यात आले नाही. किमान दिवाळी संपण्यापूर्वी तरी आरोग्य कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करावे, अशी मागणी औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भिमराव घोरपडे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्यात येत आहे. मात्र, राहण्यासाठी सुस्थितीत निवासस्थाने उपलब्ध नाहीत. निवासस्थान आहे, तर दरवाजे-खिडक्या तुटलेल्या आहेत. काही ठिकाणी विजेची सुविधा नाही, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या जिवाची कोणीही पर्वा करीत नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मंजूर पदापैकी ५० टक्के पदे रिक्त आहेत. सन २०१९पासून भरतीप्रक्रिया सुरू असून, आजतागायत भरतीप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. एकट्या पालघर जिल्ह्यातील संपूर्ण रिक्त पदांचा आकडा हा हजारांच्या घरात आहे. अशा परिस्थितीतही कर्मचारी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत आहेत. राज्यातील सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना गणपती उत्सवाच्या काळात आगाऊ वेतन देण्यात आले. परंतु, वेतनासाठी पुणे कार्यालयाकडून अनुदान वितरित करण्यात आले नाही, या सबबी सांगून प्राथमिक आरोग्य पथकातील आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक, औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य सेविका व शिपाई अशा पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतनच अदा न केल्याने पर्यायाने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कर्जांचे हफ्ते थकले असून, वसुलीच्या तगाद्यांने जीव अगदी मेटाकुटीला आला आहे. तसेच हप्ते थकल्याने त्यावरील व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे आमचे दुहेरी नुकसान होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करीत आहेत. दोन विभागांचे काम... प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी हे ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. परंतु, सर्व योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्या जातात. अशावेळी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशा दोन विभागांचे आदेश पाळावे लागतात. कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास दोन्हीं विभागातील अधिकारी हात वर करतात. तर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आरोग्य पथकाचे काम सांभाळून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. करोनाकाळात सर्व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा दिली. यावेळी या आरोग्य कर्मच्याऱ्यांना सोयीसुविधा देणे, तर दूरच; परंतु आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेतनासाठीही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते, ही दुर्दैवाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य अध्यक्ष भिमराव घोरपडे यांनी दिली. अडीच हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. किमान दिवाळी संपण्यापूर्वी तरी थकीत वेतन अदा करावे. - भिमराव घोरपडे, अध्यक्ष, औषध निर्माण अधिकारी संघटना