
मुंबई: यांना शिक्षणमंत्री म्हणून भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. भाजपचे नेते अलीकडच्या काळात इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? त्यांना शिंदे गटाने कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट आणि शाप लागले आहेत का? अन्यथा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसतात, अशी बोचरी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षणसंस्था उभारण्यासाठी भीक मागितली, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. परंतु, त्यानंतरही चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात असताना समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. यानंतर चंद्रकांत पाटील आणि शिंदे-फडणवीस सरकार कमालीचे आक्रमक झाले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ''तून चंद्रकांत पाटील आणि शाईफेकीच्या प्रकरणाबाबत सविस्तरपणे भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सध्या कटुतेचा जो स्फोट झाला आहे, या वातावरणास भाजपच जबाबदार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक झाली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही. पण शेवटी पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यामुळे शाईफेकीचा स्फोट झाला, असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रातील एक वर्ग वेगळेच सांगतो आहे. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी तिकडे जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. त्यामुळे शिंदे गटाने नक्की कोणाविरोधात जारण-मारण केले, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला असल्याचे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.