
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोना संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या काही देशांमध्ये वाढत आहे, मुंबईमध्ये करोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय तसेच प्रशासकीय उपाययोजना करण्यात आल्या असून सध्या मुंबईमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या वाढली तर त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून कस्तुरबा, सेव्हन हिल्स रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात येईल. जंबो रुग्णालये सध्या उपलब्ध नसली तरीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अशा प्रकारच्या रुग्णालयांची उपलब्धता कशी करावी याचा अनुभव आहे त्यामुळे त्यादृष्टीनेही गरज पडल्यास विचार करण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे. मास्कसक्ती नाही, परंतु हलगर्जी नको तूर्तास मास्कसक्ती नाही. मात्र करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार करोनाप्रतिबंधक वर्तन असावे याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. गर्दीच्या ठिकाणी, सहव्याधी असलेले रुग्ण तसेच गर्भवती माता यांनी मास्कचा वापर करायला हवा. गर्दीची ठिकाणे टाळायला हवीत. कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास त्वरित वैद्यकीय चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुंबईमध्ये करोनाचे निदान करणाऱ्या चाचण्या कमी होत असल्या तरीही या चाचण्या वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे. बूस्टरचे प्रमाण १६ टक्के पहिली व दुसरी लसमात्रा घेतलेल्यांची संख्या मुंबईमध्ये समाधानाकारक असली तरीही बूस्टर मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण सोळा टक्क्यांपेक्षा कमी आहे. सध्या मुंबईमध्ये कोव्हिशील्ड व कोर्बोवॅक्स या दोन्ही मात्रा उपलब्ध नाहीत. कोव्हॅक्सिनच्या नऊ हजार मात्रा उपलब्ध आहेत. त्या पुरेशा नाहीत. पालिकेने राज्य सरकारकडे मागणी केली आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नसून पूर्ण देशामध्ये आहे. लवकरच या संदर्भात काही तोडगा निघेल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केला. मनुष्यबळाचा तुटवडा पडणार नाही कंत्राटी पद्धतीने करोना प्रतिबंधाच्या वैद्यकीय सुविधेसाठी मनुष्यबळाची उपलब्धता करण्यात आली होती. यावेळी मनुष्यबळाचा तुटवड्याची स्थिती निर्माण होणार नाही अशी खात्री अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. ७५०० डॉक्टरांची उपलब्धता ठेवण्यात येईल. तर ११५७ मेट्रीक टन ऑक्सिजनची उपलब्धताही ठेवण्यात आली आहे. २६ जानेवारीपर्य मुंबईमध्ये १०० पॉलिक्लिनिक्सची उपलब्धता होणार आहे. आजारांचे निदान व वैद्यकीय उपचारांसाठी या क्लिनिकमध्ये डॉक्टरांची सुविधा असेल.असंसर्गजन्य आजारांच्या सर्वेक्षणासाठी आशासेविकांची मदत घेण्यात येणार आहे. या पॉलिक्लिनिकमध्ये बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. कमी वेतनामुळे त्यांनी काम सोडू नये यासाठी त्यांना ७२ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. पन्नास रुग्णानंतर पुढील चाळीस रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्यास एक लाख दहा हजार रुपयापर्यतचे वेतन देण्यात येईल. उच्च रक्तदाबाच्या सर्वेक्षणासाठी आशासेविकांची मदत घेण्यात येणार आहे.