
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क रद्द करावे, या मागणीसह इतर मागण्या मान्य करण्यासाठी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंदचा आज (दि. १) बारावा दिवस आहे. अद्यापही केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कांद्याचे लिलाव बेमुदत कालावधीसाठी बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हा व्यापारी असोसिएशनने पिंपळगाव येथील बैठकीत शनिवारी घेतला.याबाबत असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले, की आमच्या रास्त मागण्यांची दखल केंद्राने घेणे अपेक्षित आहे. अद्यापही केंद्र सरकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असून, बेमुदत कालावधीसाठी बंद कायम ठेवण्यावर असोसिएशनच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र सरकारच्या सहकार्यातून मार्ग काढण्यासाठी, कृषी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार, नाफेड संस्थेचे अपर व्यवस्थापकीय संचालक एस. के. सिंग, ‘ एनसीसीएफ’चे व्यवस्थापकीय संचालक ॲनीस जोसेफ चंद्रा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा उपस्थित होते. कांदा उत्पादन, खरेदी-विक्री दराविषयी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी, गरीब व मध्यमवर्ग सगळ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचा राज्य सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न असल्याची भूमिका सत्तार यांनी मांडली. अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. विंचूर उपबाजारात लिलाव सुरूजिल्ह्यात केवळ विंचूर उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव सुरू आहेत. गुरुवारपासून या बाजार आवारात २२ हजार क्विंटलपेक्षा जास्त आवक झाली आहे. या ठिकाणी कांद्याला सरासरी २१०० रुपये दर मिळाला आहे.