क्रिकेटचा वाद विकोपाला; रागात मुंबई पोलिसावर तलवारीने हल्ला, घटनेनं तरुणाचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 15, 2024

क्रिकेटचा वाद विकोपाला; रागात मुंबई पोलिसावर तलवारीने हल्ला, घटनेनं तरुणाचा मृत्यू

https://ift.tt/MiBS7zU
जळगाव: क्रिकेट स्पर्थेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम अर्जुन आगोणे (२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरिकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी त्याला मयत घोषित केले. ही वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील आणि सहकाऱ्यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.