बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या, कार्यालयात घुसून संपवलं; नवी मुंबई हादरली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 14, 2024

बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या, कार्यालयात घुसून संपवलं; नवी मुंबई हादरली

https://ift.tt/Una9vz3
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : उलवे भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यवसायिकाची सीवूड्स सेक्टर-४४मधील त्याच्या कार्यालयात डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मनोज सिंग (३९) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुली कार्यालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनोज सिंग यांची हत्या त्याच्या जवळच्याच व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. मनोज सिंग हे उलवे येथील रहिवासी होते. सीवूड्स सेक्टर-४४ भागात त्यांचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे. त्यांचे उलवे परिसरात काही इमारतींच्या बांधकामाचे प्रकल्प सुरू होते. शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून त्याला भेटण्यासाठी कार्यालयात काही व्यक्ती येत असल्यामुळे घरी पोहोचण्यास उशीर होईल, असे सांगितले. जास्त उशीर झाल्यास रात्री कार्यालयातच झोपणार असल्याचेही ते म्हणाले होते. शुक्रवारी रात्री उशिरा मनोज यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांची हत्या करून पलायन केले. शनिवारी सकाळी ११च्या सुमारास त्यांच्या कार्यालयातील दोन मुली आल्यानंतर मनोज यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे आढळले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. मनोज यांना धमकीचे फोन येत असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीनेही पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.