भाजपचा 'गरज सरो'चा दुसरा अंक सुरू: शिवसेनेचे टीकास्त्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 31, 2019

भाजपचा 'गरज सरो'चा दुसरा अंक सुरू: शिवसेनेचे टीकास्त्र

https://ift.tt/2N1IhrJ
मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी, राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच, शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद आणि समान वाट्याच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतलीय. त्यात आता शिवसेनेनं भाजपवर समान वाटपावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'गरज सरो, वैद्य मरो'चा दुसरा अंक सुरू झाला आहे, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना यांच्यात समान वाटा आणि मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. समान वाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतानाच, शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून दिलेल्या आश्वासनाची वारंवार आठवण करून दिली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. २०१४ मध्ये देशात मोदी यांच्या नेतृत्वाखाली यश मिळताच भाजपनं शिवसेनेसोबतची युती तोडली आणि २०१९मध्ये तसेच यश मिळाल्याप्रमाणे गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरू झाला आहे, असं मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. येथे वैद्य मरणार नाही. त्याच्या जिभेखाली संजीवनी गुटिका आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्री हे सत्तापद नाही व त्याचे समान वाटप करता येणे शक्य नसेल असे कुणाला वाटत असेल तर त्या बिन ‘सत्ते’च्या पदासाठी देशभरात इतका आटापिटा कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे. उद्धव काय म्हणाले? >> मुख्यमंत्रिपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की. जर सर्वकाही आधीच ठरले असेल तर ‘पेच’ का पडावा? >> आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. महाराष्ट्राचा वैचारिक पाया ‘धर्म’ आणि ‘नीती’ यावर टिकून आहे. पाया विचारांचा असतो. त्यावर शिखरे उभारली जातात. आम्ही शिवरायांच्या विचाराने व शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेचा वसा घेऊन पुढे जात आहोत, मग ‘पेच’ पडोत नाही तर ‘चक्रव्यूह’ निर्माण होवोत. लढणार्‍यांना संकटांची पर्वा ती काय! >> महाराष्ट्राच्या राजकारणास चार दिशा आणि चार पाय फुटले आहेत. राज्याच्या हितासाठी हे बरे नाही. >> २४ तारखेला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण ३०-३१ तारीख उलटून गेली तरी सरकार स्थापनेच्या हालचाली नाहीत. >> ‘युती’स जनादेश मिळूनही हे अधांतरी वातावरण निर्माण झाले. या काळात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या पक्षाचा विधिमंडळ नेता निवडला आहे, पण अखिल हिंदुस्थानचे लक्ष लागले आहे ते युतीचे नक्की काय होते? >> सत्तापदांचे समान वाटप हा दोन पक्षांतील कळीचा मुद्दा आहे. कळ लावण्याचे तसे कारण नव्हते, पण कळ लागली आहे. >> युती किंवा आघाड्यांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या यापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो तो परस्परांत झालेला सत्तावाटपाचा करार. निवडणूक लढवताना तो पाळला पाहिजेच, पण निकालानंतरही हा करार दोन्ही बाजूंनी पाळणे तितकेच महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते. >> लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘युती’च्या विझलेल्या वाती पेटवताना जे ठरले होते ते सर्व अमलात आणावे. शिवसेनेची मागणी आहे ती एवढीच. युतीच्या वाती पेटवताना विश्वासाचे तेल समईत ओतले. ते तेल नव्हते तर गढूळ पाणी होते काय? तर अजिबात नाही. >> सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला व तो सहमतीने वापरला. आता एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री पद हे ‘सत्तापदा’त येत नाही असे कुणाचे म्हणणे असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील. >> जे ठरले आहे त्यासाठी साक्षीपुराव्यांची गरज नाही, पण सध्या धर्मग्रंथांवर हात ठेवून लोक शपथेवर खोटे बोलतात असा जमाना आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व मानतो. शिवसेनाप्रमुखांकडून हा संस्कार आम्ही घेतला आहे.